
जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था -सीसीआरआयने तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी एक उत्प्रेरक (कॅटलिस्ट) म्हणून काम करायला पाहिजे – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे आवाहन
नागपूर, 26 जून 2022.
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था – सीसीआरआयने तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी एक उत्प्रेरक (कॅटलिस्ट) म्हणून काम करायला पाहिजे. या संस्थेमधील उत्तम तंत्रज्ञान कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी कामी आलं पाहिजे. संस्थेन जगातील सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संस्थासोबत संयुक्त भागीदारी केली पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात केले. भारतीय कृषी संशोधन संस्था – आयसीएआरच्या अंतर्गत अमरावती रोड येथील केंदीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था – सीआयसीआरच्या वतीने ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी द्वारे रोगमुक्त लिंबूवर्गीय वनस्पतीचे उत्पादन’ या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोजन – एनबीएसएसएलयूपीच्या सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयसीएआरचे सचिव डॉ. त्रिलोचन महापात्रा, सीसीआरआयचे संचालक डॉ . दीलीप घोष, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ .सी .डी . मायी प्रामुख्याने उपस्थित होते.
संत्रा पिकाच्या तसेच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यासाठी संशोधनाची गरज आहे . यासाठी संत्र्यांच्या ‘रूट स्टॉक ‘ची चांगली क्वालिटी सीसीआरआय संस्थेने तयार करून ती स्वस्त दरात शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. यासाठी खाजगी रोपवाटिका यांसोबतच डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ तसेच जगातील ज्या संस्थेमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान असेल त्यांच्यासोबत जॉइंट व्हेंचर करावे असे गडकरींनी यावेळी सुचवलं. संत्रा पिक उत्पादन खर्चात कमी होण्यासाठी ड्रोनव्दारे नॅनो युरिया फवारणी केल्यास संत्रा पिकांना द्रवरूप युरिया जास्त प्रमाणात मिळेल त्यामुळे उत्पादन वाढेल असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रसंगी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उपकरणांचे वितरण सुद्धा करण्यात आले. संत्रापिक लागवड आणि प्रक्रिया उद्योगात चांगली कामगिरी करणाऱ्या रोपवाटिकाच्या मालकांना, प्रक्रिया उद्योगाच्या मालकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं. याप्रसंगी सीसीआरआयचे संचालक डॉ. दीलीप घोष यांनी संस्थेद्वारे निर्माण करण्यात आलेल्या ‘नॅशनल सिट्रस डिपॉझिटरी’ विषयी माहिती दिली. यामध्ये देश विदेशातून आणलेल्या संत्रा पिकाच्या 500 जर्मप्लास्मचे संवर्धन करण्यात येत असल्याने रोगमुक्त रोपांचे वितरण करण्यात आल्याचे डॉ . घोष यांनी सांगितले.
डॉ. सी.डी. मायी यांनी सीसीआरआयद्वारे दरवर्षी लाख ते दीडलाख रोगमुक्त संत्रारोप शेतक-यांना पुरवले असल्याची माहिती देत यामध्ये अधिक वाढ होण्याची आशा व्यक्त केली.
यावेळी सीसीआरआयद्वारे प्रकाशित माहितीपुस्तकीचे प्रकाशन तसेच कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीमध्ये सीसीआरआयद्वारे प्रयोगशाळेच्या साहित्याचे हस्तांतरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
या परिषदेला आयसीएआरचे अधिकारी, नर्सरी मालक, विदर्भातील काटोल वरुड मोर्शी तसेच नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Total Users : 10828