
पालघर प्रतिनिधी : सौरभ कामडी जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आणि सारसून ग्रामपंचायतींना दळणवळणाकरिता जोडणाऱ्या लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलाची गेल्या २० वर्षांपासूनची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. २००६ पासून सातत्याने निवेदने देऊन व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या हिरडपाडा ग्रामस्थांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.पिथोडी-दहाड मार्गावरील लेंडी नदीवर पूल नसल्याने हिरडपाडा आणि सारसून या दोन्ही ग्रामपंचायतींतील सुमारे अंदाजे आठ हजार नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सारसून ग्रामपंचायतीची सुमारे ४,५०० तर हिरडपाडा ग्रामपंचायतीची सुमारे ३,५०० लोकसंख्या या मार्गावर अवलंबून आहे. मात्र पूल नसल्याने नागरिकांना १५ ते २० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.विशेषतः दोन्ही गावांतील आरोग्य उपकेंद्रांत येणाऱ्या गर्भवती महिलांच्या (ANC) आणि प्रसूतीनंतरच्या मातांच्या (PNC) आरोग्यसेवांवर याचा गंभीर परिणाम होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे कठीण ठरत असून, पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर दोन्ही गावांतील संपर्क पूर्णपणे तुटतो.शिक्षण व्यवस्थेवरही या समस्येचा परिणाम होत आहे. गगणगीर येथील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने त्यांचा वेळ आणि श्रम वाया जात आहेत. पावसाळ्यात हा प्रवास अधिक धोकादायक बनत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली.शेतीच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती नदीच्या दोन्ही बाजूंना असल्याने शेतीची अवजारे, खत, बियाणे तसेच शेतमालाची वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागते. गुरे-ढोरे ने-आण करतानाही जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.हिरडपाडा ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात इशारा देण्यात आला आहे कल्पेश भोरे, प्रवीण मर्या भोरे, ज्येष्ठ नागरिक जाणू येशू माळी, गंगा येशू माळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थिती निर्णय घेण्यात आला आहे हिरडपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भोरे (माळी) यांनी तसेच सारसून ग्रामपंचायतीच्या सरपंच काकडी नवसू जंगली यांनीही पुलाच्या मागणीला पाठिंबा दर्शवत शासनाने तातडीने कायमस्वरूपी पुलास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.ग्रामस्थांनी प्रशासनावर गेल्या दोन दशकांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, पुलाच्या कामास तातडीने मंजुरी न मिळाल्यास आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.प्रतिक्रिया”प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा””हिरडपाडा ग्रामस्थ गेली २० वर्षे पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांच्या आरोग्यसेवा, दळणवळण तसेच शेतकऱ्यांच्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पुलाच्या कामाला तातडीने मंजुरी द्यावी. अन्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या मतदान बहिष्काराच्या भूमिकेची जबाबदारी प्रशासनाची राहील.”- – भारती भोरे (माळी), सरपंच, हिरडपाडा ग्रामपंचायतकोट :-“सारसून ग्रामपंचायतीचा पूर्ण पाठिंबा””हिरडपाडा परिसरातील नागरिकांची पुलाची मागणी रास्त आणि न्याय्य आहे. पूल नसल्यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि शेतकरी सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीपलीकडील शेतीत जाणे, शेतमालाची वाहतूक करणे तसेच गुरे-ढोरे ने-आण करणे धोकादायक बनले आहे. शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी पुलाला मंजुरी द्यावी. सारसून ग्रामपंचायत हिरडपाडा ग्रामस्थांच्या या न्याय्य मागणीसोबत ठामपणे उभी आहे.”- – काकडी नवसू जंगली, सरपंच, सारसून ग्रामपंचायत
Total Users : 10828