
मोखाडा | सचिन वझरे
आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज वाकडपाडा हायस्कूल ता. मोखाडा जि. पालघर येथे उत्साहात संपन्न झाला.
समितीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून मोखाडा, जव्हार व शहापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच आदिवासी समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन अडीअडचणीच्या काळात मदतीचा हात देण्याचे कार्यही समितीकडून करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ उपस्थित होते, तर माजी विस्तार अधिकारी भरत गारे गुरुजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, दैनिक पुढारीचे पालघर ब्युरो चीफ हनिफ शेख यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना विनोदी शैलीत मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व आणि भविष्यातील संधींबाबत प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमास आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
Total Users : 10828