
मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.
मोखाडा प्रतिनिधी – सचिन वझरे
पालघर जिल्ह्यातील मोखाडा हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भाग असून तो आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर राहिलेला आहे. येथे जणू काळ वीस वर्षे मागे थांबला आहे. आर्थिक मागासलेपणासोबतच शैक्षणिक दृष्टीनेही हा परिसर अनेक अडचणींशी झुंज देत आहे. येथील अनेक विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत. इथल्या लेकरांच्या डोळ्यांत प्रश्न आहेत; पण उत्तरांची दिशा नाही. शाळेत ते जातात, पण मुळात शिक्षण का घ्यायचे आणि शिक्षणामुळे आयुष्याला दिशा कशी मिळते, याची जाणीव त्यांना होत नाही. त्यामुळे आयुष्याबद्दल कोणतीही स्वप्ने न पाहता ते केवळ “शिकायचं म्हणून शिकतात” अशीच अवस्था दिसून येते. घरातील गरिबी, पालकांचे शिक्षणाबाबतचे मर्यादित ज्ञान, रोजच्या जगण्याचा संघर्ष, असंतुलित आहार आणि वाढते व्यसनांचे आकर्षण या साऱ्या घटकांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. गरिबीने त्यांची भूक फक्त पोटापुरती मर्यादित ठेवलेली नाही तर तिने त्यांच्या विचारांचे, आरोग्याचे आणि आत्मविश्वासाचेही कुपोषण केले आहे. मुले शाळेत उपस्थित असतात; पण मन मात्र अभ्यासात गुंतत नाही. तसेच इयत्ता १० वी-१२ वी हे आयुष्याला कलाटणी देणारे अत्यंत महत्वाचे वर्ष असते आणि याच टप्प्यावर मिळालेले यश विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देते. म्हणूनच या निर्णायक वळणावर विद्यार्थ्याना योग्य जाणीव करून देणारे, त्यांना दिशा देणारे मार्गदर्शन असणे अत्यावश्यक असते. ही गरज अचूकपणे ओळखून गेली २५ वर्षे “सक्सेस कॉम्प्युटर्स ” च्या संचालिका वैशाली पाटील या मोखाडा तालुक्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देतात. “ तणावमुक्त परीक्षा ”, “ आनंददायी परीक्षा ” अशा उपक्रमांद्वारे वैशाली पाटील इयत्ता १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात. परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने सामोरे कसे जायचे ?अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, परीक्षा काळातील आरोग्याची काळजी, ताणतणाव ओळखणे आणि त्यावर मात करणे हे सर्व त्या अत्यंत आपुलकीच्या, हलक्या-फुलक्या आणि विनोदी शैलीत समजावून सांगतात. त्यांच्या शब्दांमुळे भीती विरघळते आणि परीक्षेकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. वैशाली पाटील विद्यार्थ्याना परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनासह १० वी-१२ वी नंतरच्या करिअर संबंधित योग्य पर्याय निवडताना घ्यायची काळजी, भविष्यातील करियरच्या संधी तसेच आधुनिक युगात संगणक शिक्षणासह कृत्रिम बुद्धिमत्तेचे ( AI ) वाढते महत्त्व या सर्व बाबींवर त्या सखोल मार्गदर्शन करतात. शिक्षकांचे परिश्रम आणि पालकांचा त्याग याची जाणीव करून देत ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व त्या विद्यार्थ्यांच्या मनात रुजवतात. केवळ यशस्वीच नव्हे, तर सुसंस्कृत, जबाबदार आणि मूल्याधिष्ठित नागरिक घडवणे हाच त्यांच्या कार्याचा खरा उद्देश आहे.“ प्रत्येक शाळा माझी आहे आणि प्रत्येक विद्यार्थी माझा आहे ” ही भावना त्यांच्या कार्यामागील खरी प्रेरणा आहे. मार्गदर्शन करताना त्या केवळ शब्दांवर थांबत नाहीत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आत्मविश्वास आणि हास्य पाहण्यासाठी त्या चॉकलेट्स देत मायेचा स्पर्श देतात. तसेच १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेसाठी शुभेच्छांसह आकर्षक परीक्षा वेळापत्रक कार्ड देतात, जे विद्यार्थी सहज खिशात किंवा कंपास मध्ये ठेवू शकतात. हे कार्ड केवळ माहिती देणारे नसून धीर देणारे आणि प्रेरणा देणारे असते. आदिवासी भागातील मुलांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे उज्ज्वल आयुष्य घडवावे, उच्च पदांवर पोहोचावे आणि त्यातून संपूर्ण मोखाडा तालुक्याचा विकास व्हावा हीच त्यांची अखंड तळमळ आहे. शिस्त, संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांचा समतोल साधत त्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे खरे महत्त्व समजावून देतात. आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात संगणक साक्षरता ही निवड नसून गरज आहे, हे त्या सातत्याने अधोरेखित करतात. MS-CIT सारख्या अभ्यासक्रमांमुळे आत्मविश्वास वाढतो, संधींचे नवे दरवाजे उघडतात आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनाही काळाबरोबर चालण्याची ताकद मिळते, हा विश्वास त्या मुलांच्या मनात रुजवतात. न थकता, न थांबता, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सुरू असलेले त्यांचे कार्य मोखाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयुष्याला दिशा देणारे मार्गदर्शन ठरत आहे. “ आज ज्यांच्या हातात पुस्तके आणि संगणक आहेत; उद्या हेच हात स्वतःचे भविष्य घडवतील ” असे त्या नेहमी विद्यार्थ्याना सांगतात. मोखाड्यासारख्या दुर्गम भागात आशेची नवी पहाट रुजवणारे सक्सेस कम्प्युटर्सच्या संचालिका वैशाली पाटील यांचे कार्य कायम अर्थातच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचे आहे हे या अनुषंगाने अधोरेखित होते.
Total Users : 10828