
आदिवासी क्रांती दल – पालघर यांचा अनाथ बालकांना मदतीचा हात,…..
जोहार इंडिया 24 न्यूज.
( जव्हार प्रतिनिधी )रामदास गाडर .
जव्हार-२९ जून, जव्हार येथील न्याहाळे तळ्याचापाडा मध्ये दोन अनाथ बालके सचिन गोविंद व कामिनी गोविंद ही भावंडे एका झोपडीत राहत असून ते कसे बसे आपला उदरनिर्वाह करत आहेत. हे वास्तव शेजारील गावातील एक सुशिक्षित युवक संतोषभाऊ गोविंद याच्या निदर्शनास आले त्यांनतर त्यांनी सोशल मीडियाच्या मध्यमातून लोकांपर्यंत त्यांच्या मदतीसाठी आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत आदिवासी क्रांती दलाचे पालघर जिल्हा अध्यक्ष – प्रकाश पाटकर यांनी आपल्या संघटनेच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचून मदत केली. त्यांना जीवनावश्यक वस्तू, कपडे, पायातील चप्पल, शैक्षणिक साहित्य, दोन महिने पुरेल इतके किराणा सामान सामाजिक जाणिवेतून उपलब्ध करून दिले.
सचिन हा इयत्ता सातवीत शासकीय आश्रमशाळा न्याहाळे येथे शिक्षण घेत असून तो आपडाऊन करत होता तसेच कामिनी ही जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिक्षण घेत होती. या बिकट परिस्थितीमुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आदिवासी क्रांती दल-पालघर यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प – जव्हार कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी – मा.विजय मोरे साहेब, सुभाष परदेशी साहेब (शिक्षण विभाग ) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या मुलांचे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा- न्याहाळे ता.जव्हार येथे शालेय प्रवेश व वसतिगृहात राहण्याची सोय करून मदतीचा हात दिला. या कामी शाळेचे मुख्याध्यापक श्री.वसंत म्हस्केसर , अधीक्षक- शिंपी सर ,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कांबळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष- भूषण महाले, युवा जिल्हा उपाध्यक्ष- महेश भोये,जिल्हा सल्लागार -दामूदादा मौळे,मिलिंद बरफ, दीपक गावंढा पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी क्रांती दल – पालघर यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Total Users : 10829