
हवामान बदलामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना मच्छीमार समाजाच्या समस्येकडे आमदार, खासदार, लक्ष देत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींवर बहिष्कार..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर, जिल्हा : हवामान बदलामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना मच्छीमार समाजाच्या समस्येकडे आमदार, खासदार, लक्ष देत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींवर बहिष्कार टाकण्याची भूमिका सातपाटी गावाने घेतली आहे
सातपाटी गावातील मच्छीमार सहकारी संस्था व मच्छीमारांनी ही ठाम भूमिका घेत लोकप्रतिनिधींवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
सातपाटीमधील सर्वोदय सहकारी मच्छीमार संस्था, मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था व सातपाटी मच्छीमार समाजाने आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना गावात ‘नो एन्ट्री’ असा एकमुखाने निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. मच्छीमार समाज अनेक समस्यांना तोंड देत आहे. मासेमारी बंदी कालावधी कमी असल्यामुळे मासेमारी पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. याचा परिणाम मत्स्य व्यवसायावर होत आहे; पण मच्छीमारांची ही अवस्था लक्षात घेत कोणीही पुढे येत नसल्यामुळे आता मच्छीमार समाज एकवटला आहे. याच बरोबरीने मासेमारी बंदीचा कालावधी साठ दिवसावरून ९० दिवसांचा करावा, अशी मागणी होत आहे. हा मासेमारी बंदी कालावधी १५ मे ते १५ ऑगस्टपर्यंत असावा, अशी मागणी केली जात आहे. तसे पत्र केंद्र सरकार व राज्य सरकार यांना देण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या हंगामात ७ ऑगस्टपासून वादळी वारे, खराब हवामान, जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी बंदरात परतल्या. मात्र किनाऱ्यावर आलेल्या मच्छीमार बोटी अजूनही किनाऱ्यावरच आहेत. मच्छीमारीच्या एका फेरीसाठी दीड लाख रुपये खर्च येतो. समुद्रात गेल्यानंतर वादळाचा इशारा दिल्यानंतर मच्छीमारांना पुन्हा बंदराकडे फिरावे लागते, ही नुकसानभरपाई कोण देणार? असे वारंवार घडत असते. कोणतेही लोकप्रतिनिधी अथवा सरकार या मच्छीमारांकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधींना गावात येऊ न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
शासनाच्या परिपत्रकानुसार चालू वर्षी १ ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगामास सुरुवात झालेली आहे. मात्र पालघर, ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारी बोटी समुद्रात जाऊन मच्छीमारी न करता रिकाम्या हाताने परत आल्या आहेत. यात मच्छीमाराचे प्रचंड नुकसान झाले; मात्र शासनाने कोणतीही भरपाई दिलेली नाही.
– पंकज पाटील, अध्यक्ष, सातपाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था
मागील अनेक वर्षांपासून मासेमारी बंद कालावधी हा महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत १ जून ते १५ ऑगस्ट असा ७५ दिवसांचा होता. आम्ही मच्छीमारांनी त्यात वाढ करून हा कालावधी ९० दिवसांचा व्हावा, अशी मागणी केली होती; परंतु काही भांडवलदार मच्छीमारांच्या मागणीनुसार मासेमारी बंदी कालावधी हा ६१ दिवसांचा करण्यात आला. मात्र लोकप्रतिनिधी व शासन याकडे लक्ष देत नाही.
– सुभाष तामोरे, मच्छीमार नेते, सातपाटी
Total Users : 10829