
अखिल भारतीय आदिवासी वारली समाज सेवा संस्थेची सभा संपन्न…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी – वाडा
दिनांक 30 ऑक्टोंबर 2022 रोजी ‘अखिल भारतीय आदिवासी वारली समाज सेवा संस्था’ च्या माध्यमातून पालघर, ठाणे, नाशिक, गुजरात, सेलवास, दादरा नगर हवेली इत्यादी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या वारली समाजाची सभा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री दत्तात्रेय पांडुरंग भुयाळ यांच्या अध्यक्षतेखाली भुयाळ वाडी पाली ,तालुका- वाडा ,जिल्हा- पालघर ,महाराष्ट्र ह्या ठिकाणी आयोजित केली होती सदर सभेमध्ये ,पालघर, ठाणे ,नाशिक गुजरात ,दादरा नगर हवेली, मुंबई, नवी मुंबई इत्यादी ठिकाणाहून बहुसंख्या वारली बांधव उपस्थित झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय श्री.रामू डोके साहेब यांची निवड करण्यात आली. सदर सभेमध्ये चालू वर्षीचे तिसरे आदिवासी वारली महासंमेलन हे नाशिक ह्या ठिकाणी दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. आदिवासी वारली संस्कृती संवर्धन या विषयावर बोलताना विविध मान्यवराने आपली संस्कृती ही एक परिपूर्ण संस्कृती व जगाला सत्याकडे घेऊन जाणारी संस्कृती आहे.आदिवासी जगाला,वाचला तर जग वाचेल.आणि म्हणून आपण आदिवासी संस्कृतीचे जतन केलं पाहिजे ,संवर्धन केलं पाहिजे व ती वाढवली पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करावा ह्यावर भाष्य केले. आदिवासी एकता परिषद च्या महिला अध्यक्षा सन्माननीय कीर्तीताई वरठा ह्यांनी सदर सभेमध्ये वारली समाजामध्ये असणारे सोईन, धवलेरी, सवासनी ह्या पौरहित्य करणाऱ्या महिलांचे समाजामध्ये कार्य आता लोप पावत चालले आहे ह्याबाबत खंत व्यक्त केली. जगमान्य असणारे वारली पेंटिंग ह्या कलेचे राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक हे गैर आदिवासी ला दिले जाते हे वारली समाज एकत्र नसल्याकारणाने होत आहे ह्याबाबत मान्यवरांनी खेद व्यक्त केला. यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे संस्कृती संवर्धन हा विषय बोलण्यापेक्षा कृतीत आणणे गरजेचे आहे. आणि ह्यासाठी प्रत्येक वारली बांधवांनी आपल्या घरामध्ये आजी, आजोबा, आई ,बाबा ह्यांना स्थान दिल्याने संस्कृती संवर्धन हे आपोआपच होणार आहे. त्यासाठी वेगळे धडे गिरवण्याची किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आखून त्या ठिकाणी संस्कृती दाखवणे व ती कशी अमलात आणावी यासाठी व्याख्यान देणे गरजेचे नाही असे मत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री डोके सर यांनी मांडले. आदिवासी समाजाचे अस्तित्व ,अस्मिता ह्या अबाधित रहाव्या म्हणून पाली ह्या ठिकाणी तारपा चौकाची स्थापना करावी त्याचप्रमाणे ठाणे येथील कलेक्टर ऑफिस समोरील अर्धवर्तुळाकार तारपा धारी पुतळ्याचं जिर्णोद्धार करावा .
असं मत सन्माननीय श्री नरेश रोज यांनी मांडले.ह्या कार्यक्रमात पाली पोशेरी च्या नवनिर्वाचित सरपंच सौ.प्राजक्ता सचिन शिंगाडा,कोशिमशेत तालुका.मोखाडा येथील निर्वाचित सरपंच श्री सुधाकर धिंडे यांचा सत्कार करण्यात आला.ह्या कार्यक्रमासाठी वारली समाजातील वक्ते व कवी श्री रवि बूधर ,वारली टीव्ही कलाकार श्री राजेश ऊके, आदिवासी एकता परिषद सचिव श्री सुनील परहाड , गुरुनाथ बेंदर, महेश आहेडा, विश्वनाथ पासारी परशुराम निकोले, योगेश रिंजड, नवनाथ हुमान,श्याम खेत्री, अतुल डोंगरे ,रतन चोथे, नंदकुमार चौधरी ,मकरंद बात्रे, राजेश चौधरी, दत्तात्रय कोम,गुरुनाथ वळवी ,सोमा तुंबडा, वीनायभाई कुवरा,भारत पटारा,भगवान मेघवाल,श्रीमती. प्रेमा पाडवी व इतर वारली बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश डोले यांनी केले.

Total Users : 10829