
मनसावळी वर्धा बसच्या अनियमितपणामुळे विद्यार्थी मेटाकुटीस….
प्रा.दिनेश राठोड (वर्धा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अल्लीपुर येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी मणसावळी, सिरसगाव, निधा, येरणगांव, सोनेगाव खूणकर, पवनी गावावरून नियमित शाळेत येत असतात परंतु वर्धा आगाराच्या मनसावळी वर्धा बस ही अल्लीपूर ला सकाळी 10.30वा.व सायंकाळी 5.00वा येणारी गाडी ही मागील महिनाभरापासून अनियमित व उशिरा पोहचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासंतास बसची वाट पाहावी लागते. यामुळे घरी पोहचायला रात्रच होत आहे त्यामुळे अभ्यासावर परिणाम होत आहे अशी पालकांची ओरड आहे. तसेच सोनेगाव खूणकर येथील विद्यार्थ्यांना चौपाटी वरून घरी जाण्यास खूप काळोख होऊन अंधारात पोहचावे लागत आहे. या काळोखात वन्य प्राणी ही आडवे जातात असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या त्रासामुळे विध्यार्थी शाळेतही उशिरा आणि घरीही उशिरा पोहचत आहेत. कधी काय घडेल याची पालकांमध्ये भीती निर्माण झाली. तरी आगार प्रमुखांनी यावर लवकर तोडगा काढावा अन्यथा मोठे आंदोलन बससाठी करावे लागेल असे पालकांचे म्हणणे आहे.

Total Users : 10829