
वर्ध्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; शेतीतील पीके जमिनदोस्त…
प्रा.दिनेश राठोड(ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा.
वर्धा-जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट,निंबोली, काशिमपूर, सर्कसपूर, एथलापूर, टोणा, अहिरवाडा, रहिमाबाद, देउरवाडा, अंबिकापूर, भाईपूर, दौलतपूर, कर्माबाद आदी भागात अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. सततच्या खराब हवामानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळीचा पंचनामा करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गतवर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातून सावरण्यासाठी रब्बी हंगामात हरबरा आणि गहू पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, त्यालाही अवकाळी पावसाने नेस्तनाबूत केले आहे. हरभरा पिक नैसर्गिक आपत्तीतून कसेबसे वाचले. पण हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक पावसाने मातीत मिळवले आहे.
आम्ही कसे जगावे : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता जगायचे कसे, असा सवाल शेतकरी करत आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली असून नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. तरच शेतकरी अवकाळी पावसापासून सावरेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
घराचे पत्रे उडाले : जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून मोठे नुकसान झाले आहे. वारा, विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळीने अनेक नागरिकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले आहेत. या खराब हवामानाचा सर्वाधिक फटका देवळी तालुक्याला बसला आहे. देवळी तालुक्यातील काही भागात गारपिटीमुळे तेथील पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकरी, शेतमजूर इतर नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.
Total Users : 10829