
पोटखळपाडा जलजीवन मिशन पासून वंचित
पाण्यासाठी कोसोदूर महिलांची फरफट….
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड ji24news.
विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उटावली पैकी पोटखळपाडा जलजीवन मिशन योजने पासून वंचित राहिला असून, सदर गावाला योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत “१९ ऑगस्ट २०१९ रोजी जल जीवन मिशनची घोषणा झाल्यापासून हि ‘जल जीवन मिशन` योजना देशात राबविली जात आहे. “हर घर जल” या संकल्पनेसह, भारत सरकारने २०२४ पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन (JJM) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी दिले जात आहे. पण शासनाच्या नजरेतून पोटखळ पाडा मात्र ‘जल जीवन मिशन’ योजनेपासून वंचित राहिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उटावली पैकी मौजे पोटखळपाडा हा येत असून या गावाची लोकसंख्या सुमारे ५०० आहे. येथे पाण्याची मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा नंतर देखील पोटखळपाडा येथील आदिवासी महिलांबरोबरच कुटुंबातील बाल वृद्धांची पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन कोसो दूर पायपीट होत आहे. त्यात मार्च महिन्यांपासून मोठी पाणी टंचाईचे चित्र आदिवासी खेडो पाड्यात दिसत आहे.
पोटखळ पाडा हा महसूल गाव आहे. सदर पोटखळ पाडा जल जीवन मिशन येजनेत समाविष्ट नसल्याचे समोर आले असुन, या पोटखळ पाड्याला जल जीवन मिशन योजनेअंतर्गत समाविष्ट करून पाणी पुरवठा मिळावा म्हणून पाड्यातील ग्रामस्थांनी उपअभियंता सो. ग्रामीण पाणी पुरवठा पालघर पंचायत समिती, विक्रमगड यांच्याकडे मागणी केली आहे.
Total Users : 10829