
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली 12,000 महिलांचा जबरदस्त हल्ला बोल!
*पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी *ji24news
रेशन, रोजगार, पाणी, आरोग्य या महिलांच्या ज्वलंत मागण्या घेऊन आज 24 मे 2023 रोजी जनवादी महिला संघटनेच्या ठाणे-पालघर जिल्ह्याने तब्बल 12,000 महिलांचा प्रचंड मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. 500-1000 महिला येतील या हिशोबाने बंदोबस्त लावलेल्या पोलिसांची ही महिलांची पाच किलोमीटर लांबीची रांग बघून बोबडीच वळली. 2014 साली पालघर जिल्हा नव्याने स्थापन झाला, त्यानंतरच्या 10 वर्षांत जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला महिलांचा हा सर्वात जबरदस्त मोर्चा होता हे सर्व अधिकाऱ्यांना मान्य करणे भागच पडले.
रोख नको, धान्य हवे: रेशन-रोजगार -पाणी-आरोग्य-शिक्षण आमच्या हक्काचे, रेशन योजना सार्वत्रिक करा अशा दमदार घोषणा देत महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून गेल्या. कोणीही प्रमुख अधिकारी मोर्चाला सामोरे न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सबंध कार्यालयालाच वेढा घातला. त्यानंतर लगेच हालचाल होऊन उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला भेटायला बोलावले. या चर्चेसाठी स्वतः आमदार विनोद निकोले हजर होते. सुमारे अडीच तास चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात आले:
1. रेशनचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व तालुक्यांच्या कॅम्पच्या तारखा ठरवण्यात आल्या. त्या दिवशी अधिकारी आणि जमसंच्या कार्यकर्त्या देखील हजर राहतील.
2. पाणी, मनरेगा आणि आरोग्य हे प्रश्न गंभीर आहेत. त्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी तारीख देऊन विशेष बैठक लावतील.
गावागावात महिलांनी भरलेल्या हजारो फॉर्म्सच्या आधारावर हे निर्णय झाले. हा जबरदस्त मोर्चा यशस्वी करण्यासाठी जनवादी महिला संघटनेच्या पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. किसान सभा, सीटू, डीवायएफआय या भ्रातृभावी संघटनांनी खूप मदत केली.
शिष्टमंडळात जमसंच्या जिल्हा सचिव लहानी दौडा, जिल्हा अध्यक्ष प्राची हातिवलेकर, जिल्हा खजिनदार सुनिता शिंगडा, सविता डावरे, संगीता ओझरे, लता घोरखाना, मेरी रावते, ताई बेंदर, गिरजी कानल, रमा तारवी, आरती डावरे, संगीता खांजोडे, मनीषा बुधर, सुनंदा पाटील, संजना सुर्वे, निकिता काकरा, कमल वळंबा अशा अनेक नेत्यांचा समावेश होता.
26 मे रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जमसंचा ठाणे जिल्ह्यातील तालुक्यांतील महिलांचा वेगळा मोर्चा काढला जाणार आहे.

Total Users : 10829