
प्रस्तावित वर्धा महानगरपालिकेत होणार 28 गावांचा समावेश…
प्रा.दिनेश राठोड( ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा)
गरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्या याकरिता शासनाने वर्धा नगर परिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी शासनाने शहरालगत असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींची माहिती गोळा करण्याचे आदेशही दिले आहे. प्रस्तावित महानगरपालिकेत 28 गावांचा समावेश करण्यात येणार असून काही गावांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर प्रशासन स्तरावर काम सुरू आहे.
आ. पंकज भोयर यांनी वर्धा नगरपालिकेचे महानगरपालिकामध्ये रुपांतर व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मंत्रालयात भेटीगाठी घेऊन महानगरपालिकेसाठी आग्रह धरला. त्यामुळे आता सरकारने प्रस्ताव मागितला आहे. यासाठी प्रशासन स्तरावर शहरालगतच्या ग्रामपंचायतींची माहिती मागितली. नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासाठी 3 लाख लोकसंख्येचे निकष पूर्ण करण्यासाठी या प्रस्तावात 28 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र, काही गावांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून ही यादी अजूनही परिपूर्ण नाही. ही सर्व माहिती गोळा झाल्यानंतर ग्रामंपचायतींना नाहरकत प्रमाणपत्र द्यावे म्हणून पत्र दिले जाणार आहे.
शहरालगतच्या बोरगाव (मेघे), सिदी (मेघे), नालवाडी, सावंगी (मेघे), पिंपरी (मेघे), म्हसाळा, वरुड, कामतवाडा, उमरी (मेघे), साटोडा, आलोडी, कारला, सालोड (हिरापूर), पालोती, बरबडी, इंझापूर, येळाकेळी, महाकाळ, भिवापूर, मेधापूर, दत्तपूर, नागठाणा. चितोडा, चिंचाळा, गणेशपूर, पांढरकवडा, नेरी आदी गावांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी या गावांचा महसूल सर्वे नंबर, गट नंबर यांचा गोषवारा गाव नकाशा, अकृषक रोजगाराची टक्केवारी 2011 नुसार स्त्री-पुरुष व एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, ग्रामपंचायत मालमत्तानिहाय यादी, इमारती गावाचे भौगोलिक स्थान व सलगता, गावनिहाय उपलब्ध पायाभूत सुविधा, गावांची वैशिष्ट्ये (पर्यटन स्थळ, तीर्थक्षेत्र), उत्पन्नाची साधने आदी माहिती त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी, असे पत्र जिल्हा प्रशासनाने पाठविले आहे.
लँडकॉस्ट आणि इन्व्हेस्टमेंट वाढेल :
Total Users : 10829