
पालघर जिल्ह्यात आदिवासी ग्रामीण भागात पावसाच्या आगमनाची चाहूल देणारी शेवळी भाजी बाजारात…..
प्रतिनिधी – दीपक भोये विक्रमगड ji24news.
या वर्षातील हंगामाप्रमाणे पहिली शेवळी बाजारात दाखल झाली असून शेवळी भाजीमुळे जंगल पट्टीतील नागरिकांना महिन्या दीड महिन्याचा रोजगार प्राप्त होत असतो. दरसाल मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर विक्रमगड जव्हार मोखाडा वाडा भागातील जंगल पट्टीत शेवळी उगवायला सुरवात होते. शेवळी उगवली म्हणजे पावसाळा अगदी जवळ आला असल्याचे येथे मानले जाते.
त्याप्रमाणे शेतीच्या कामांसह आपल्या पाऊसपूर्व कामांचे नियोजन केले जाते. उगवणाऱ्या या शेवळ्यांचा या भागात वर्षात जेमतेम एक दीड महिन्यासाठी मिळणारी एक पौष्टिक, रुचकर व औषधी भाजी म्हणून जेवणात वापर केला जातो. खास करून पावसा आधी मिळणारी शेवळी हि विशेष गुणधर्मांनी युक्त असल्याचे येथे बोलले जाते.
एकतर ज्यांना हि भाजी तयार करण्याचे अवगत आहे यांच्याशी संपर्क करून भाजी तयार करावी. पण तरीही पुढील माहितीप्रमाणे भाजी बनवताना शेवळी चिरताना खास काळजी घ्यावी लागते, मध्यभागी असणाऱ्या बोंडाला खाज खूजली असते ते काढून टाकतात. भाजी चिरताना राहून गेलेली खाज, काकडं, आंबडी पाला ह्यांचे आंबट यांचा वापर करूनच भाजी तयार करावी. काकड अंबाडीपाला यांच्यात असलेल्या आम्लारी मिश्रणाने खाज विरघळून जातात, आणि भाजी खाण्यायोग्य होते अन्यथा खाणे मुश्किल होते. कुठल्याही खताशिवाय, पाण्याशिवाय निसर्गतः उगवणारी, विविध ऋतुमानाप्रमाणे येणारी फळे, भाज्या ही आरोग्यासाठी पोषक असतात.
नागरिक पावसाअगोदरची शेवळी जास्तप्रमाणात खरेदी करून ती उन्हात सुकवून जमा करतात व वर्षभर वापरतात. मात्र या शेवळ्यांबरोबर आवळ्यासारखी दिसणारी काकडं घेणं जरुरीचे आहे. त्याशिवाय ही भाजी करताच येत नाही. अशी ही वर्षात एकदाच मिळणारी शेवळी भाजी काकडांसह बाजारात दाखल झाली आहे. काकडांसह ४ ते ५ शेवळी बांधलेली एक जुडी १५ ते २५ रुपये या भावाने अनेक नाक्यांवर, बाजारात आदिवासी, शेतकरी व वनसंपदेवर जीविका करणारे विक्रेते सध्या दिसत आहेत. ही भाजी रुचकर असली तरी ती तयार करताना काही काळजी घ्यावी लागते.

Total Users : 10829