
नोकरी मागणारे नाही तर देणारे बना- प्राचार्य डॉ किरण सावे…
बातमीदार- प्रा सोमनाथ सातपुते ji24news.
पालघर येथील सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक विभाग-उद्यान विद्याशास्त्र या विभागामार्फत घेण्यात आलेल्या ३ दिवसीय फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा दिनांक ०५/०७/२०२३ रोजी युवा केंद्र हॉल येथे माननीय प्राचार्य डॉ. किरण सावे व उपप्राचार्य प्रा. गोपीनाथ नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. दीपक बोरसे , प्रभारी अधिकारी (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,कृषी संशोधन केंद्र , पालघर) यांची उपस्थिती लाभली. हे प्रशिक्षण २०१९ पासून सुरु झाले असून आत्तापर्यंत ६ वेळा पालघर, ठाणे, मुंबई जिल्हातील विविध स्तरातील वय वर्ष २१ ते ८० या वयोगटातील विद्यार्थी, गृहिणी, नागरिक, जेष्ठ नागरिक यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. पालघर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते. त्या अनुषंगाने या नाशिवंत फळांचा ऱ्हास न होता त्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने व उद्योजकतेला चालना मिळण्यासाठी या प्रशिक्षणाची सुरुवात प्रा. प्रविणा कोचरेकर व प्रा. आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. विविध फळे आंबा, पेरू, चिकू, फणस, जांभूळ, आवळा, पपई, केळी,अननस, लिंबू, सफरचंद व भाज्या पालक, मेथी, मिरची, कांदा, टोमॅटो व इतर
यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध सरबत, जॅम, जेली, कँडी, लोणचे यांसारखे पदार्थ व्यापारी तत्वावर तयार करणे , त्यांचे पॅकिंग, सिलिंग प्रक्रिया विषयक यंत्र सामग्री, उत्पादन खर्च व उत्पादन शुल्क ठरवणे यासंदर्भातील प्रात्यक्षिके ३ दिवसीय प्रशिक्षणात देण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीमधून काहींनी आपले उद्योग घरगुती तसेच व्यापारी तत्वावर सुरु केले आहेत. त्यापैकी सौ. अमिता अनिल पाटील यांनी वाणगाव येथे फळे व भाज्या निर्जलीकरण व्यवसाय फ्रुटाॅन्स यशस्वीरीत्या सुरु केला आहे.
कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी डॉ. दीपक बोरसे यांनी पालघर जिल्ह्याचे मुबलक प्रमाणात फळे, भाज्या, फुले, मासे अशी एकाचवेळी उपलब्धता असणारा एकमेव जिल्हा म्हणून कौतुक करताना अशा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकरी व उद्योजकांनी पुढे येऊन संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. सोबत शेतकऱ्यांना शेती व मासेमारीविषयक कोणत्याची प्रकारची अडचण असल्यास सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी देखील भविष्यातील संधी पाहता नोकरदार होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असा मोलाचा सल्ला उपस्थितांना दिला. हनुमान व द्रोणागिरी पर्वत यांचे उदाहरण देताना जसे हनुमानाने आपल्या शरीराचे आकारमान वाढवून द्रोणागिरी पर्वताला उचलून आणले तसेच समस्येपेक्षा आपण मोठे झालो तर समस्या आपोआपच छोटी होते आणि त्यावर उपाय शोधायला सोपे होते असे सुचवले. उपस्थितांपैकी सौ. स्मिता पाटील-आरेकर , कु. श्रद्धा, श्री. राजेश सामंत, श्री. कोंडू पाष्टे, श्री. गाला यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या सूचनेनुसार प्रशिक्षणाचा कालावधी ३ दिवसापेक्षा ६ ते १५ दिवसांचा तसेच निवासी प्रशिक्षणाचा विचार करण्याचे आश्वासनही महाविद्यालयातर्फे देण्यात आले. प्रशिक्षणार्थींतर्फे प्रा. प्रविणा कोचरेकर आणि प्रा. आनंद जाधव यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
उपप्राचार्य प्रा. गोपीनाथ नागरगोजे यांनी विपणनाबद्दल मार्गदर्शन करताना बचत गटांचे उदाहरण देऊन आपला माल बाहेर देशात निर्यात करण्याचे सुचवले. त्यादृष्टीने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व उद्योजकांना आपला उद्योग वाढवण्यास चालना मिळेल. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. किरण थोरात तर आभारप्रदर्शन प्रा. अनिता लोहार यांनी केले. सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Total Users : 10828