
आदिवासी भागातील कवळी भाजी हा वर्षातून पहिला येणार सण मोठ्या उत्साहात साजरा …..
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड ji24news
विक्रमगड – पालघर जिल्यातील बहुल विक्रमगड तालुक्यातील आदिवासी भागात सर्वात पहिला येणार सण हा कवळी भाजीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात, नवीन पाण्याची नवीन मोड आणि पावसाळ्याची सुरुवात याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी आपल्या पिकांची पेरणी पूर्ण झाल्यावर व पाऊस पडल्यानंतर जंगलात सर्वात पहिली रानभाजी उगवते ती भाजी जंगलात जाऊन घेऊन येतात व गावातील गाव देवता, निसर्ग देवता यांना गावातील पुजारी शेंदूर लावतात व देवाला विनवनी करून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. हा सण शक्यतो मंगळवार मोडा या दिवशी उत्सव साजरा केला जातो. रविवार, सोमवार या दिवशी सकाळीच दिवसभरात महिला जंगलात कोवळी भाजी आणण्यासाठी जातात, पहिल्या पावसाच्या सुरुवातीला जे उगवते जे प्रथम खाण्यास उपलब्ध होते अशी ही कोवळी भाजी निसर्गाने दिलेले वरदानच आहे आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा करतात. ही भाजी संध्याकाळी घरोघरी शिजवली जाते आणि भाजी शिजवून झाल्यानंतर लहान मुले, मोठी माणसे घरोघरी जाऊन कोवळी भाजी घ्या असा एक संदेश प्रत्येक माणसाला देत असतात.
पहिला पाऊस एक दोन वेळा पडून गेला की, रानात शेवाळी, देहगडी, चाईची वेळ, भुईफोड, कवळी भाजी पेंडरा, लोती, करटोळी अश्या प्रकारच्या रानभाज्या रानात उगवतात.
याच पार्श्वभूमीवर कवळी भाजी चा सण ग्रामीण भागात आदिवासी साजरा करतात. हा सण कॅलेंडर प्रमाणे एका विशिष्ट तिथीलाच येत असतो असे नाही. पाऊस पडल्यानंतर कवळी भाजी रानात उगवली का? हे पाहून गावातील लोक कवळी भाजीचा एक वार निश्चित करतात. बहुधा मंगळवार या दिवशी हा सण धरण्याची प्रथा ठरवतात. या सणाला नवीन लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली आवर्जून माहेरी आणल्या जातात. रानातून भाजी आणली की त्यातली थोडीशी भाजी गावाच्या गावदेवी जवळ ठेवली जाते. नंतर घरात शिजवली की घरातल्या करंडीत ठेवलेल्या कुलदैवतांना त्यातील थोडेसे नीवद (नैवद्य) दाखवून मग लेकी बाळी सह सगळेजण जेवायला बसतात. कवळी भाजी ही बलवर्धक, आरोग्यदायी, रोगप्रतिकार शक्तीत वाढ करणारी, तसेच मेंदूत सतेज ठेवणारी व श्रीयांच्या गर्भशयातील विकार दूर करणारी आहे. असे जुनी जाती माणसे म्हणतात. या सणाच्या दिवशी आदिवासी पाड्यावर संध्याकाळी माणसे कांबड नाच,तारपावाद्य, ढोल वाद्य यांच्यावर नाचत असतात. पोरं – पोरी, पुरूष – श्रिया अगदी म्हातारी माणसे सुद्धा या वाद्य चे तालावर नाच धरतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह असायचा. पण आता गावात ढोल वाजत नाही आणि तारपा ही वाजत नाही. कारण ही वाद्य वाजवणारे माणसे आता लोप पावत चालली आहेत व नवीन पिढी ही वाद्य वाजवायला शिकत नाही.एखाद्या गावात बाहेरच्या गावाचा वाजवणार आणला तरी नवीन पोरांना नाचता येत नाही, असे चित्र ग्रामीण भागात बघायला मिळते.
Total Users : 10829