
बेशिस्त वाहनचालकांना दणका! ५८ लाख २९ हजारचा दंड वसूल; वर्धा वाहतूक शाखेची मोठी कारवाई
प्रा. दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वर्धा : वारंवार सांगूनही वाहनचालकांकडून अनेकदा वाहतुकीचे नियम मोडले जातात. अशा बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघाताच्या घटनाही घडताना दिसतात. अशा नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात आता वर्धा वाहतूक शाखेने कडक कारवाईची मोहिम उघडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांवर वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाईचा धडाका सुरु केला आहे. विना हेल्मेट, विना सीटबेल्ट, ड्रंक अँड ड्राइव्ह तसेच नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणाऱ्या बेशिस्तांवर १२ ते ३० जून या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.
ज्यामध्ये ५८ लाख २९ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मागील वर्षभरात अपघातांत ४३१ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात १२ जूनपासून जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणाऱ्या ५५२ वाहनधारकांकडून २लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. दंड वसूल करणे हा उद्देश नसून वाहतूक नियमाची जागरूकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र रेवतकर यांनी केले आहे.
Total Users : 10829