
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्घ खगोल अभ्यासक चंद्रकांत घाटाळ यांच्या ‘डम्पी’ या विज्ञान कथासंग्रह ..।
पालघर ji 24 news
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्घ खगोल अभ्यासक चंद्रकांत घाटाळ यांच्या ‘डम्पी’ या विज्ञान कथासंग्रहाची सध्या सर्व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. या पुस्तकाचा जव्हार महाविद्यालयाचे प्राध्यापक सुधीर भोईर यांनी करुन दिलेला थोडक्यात परिचय-
"डम्पी"
विज्ञान कथासंग्रह
लेखक – चंद्रकांत घाटाळ (संचालक – अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा. ता. डहाणू जि. पालघर)
पालघर जिल्ह्यातील कासा सारख्या ग्रामीण आदिवासी भागात अवकाश निरीक्षण केंद्र स्थापन करुन त्यांत मुलांना विनामूल्य खगोलीय ज्ञान देणारे आमचे चंद्रकांत घाटाळ सर हे एक अवलिया व्यक्तिमत्वच म्हणावं लागेल.
सर, मुलांना खगोलीय माहिती देण्यासोबत लेखनही करतात. त्यांत खास करुन विज्ञानकथा हा सरांचा आवडता विषय. या आवडीतूनच त्यांचा डम्पी नावाचा पहिला विज्ञान कथासंग्रह प्रकाशित होतोय. या विज्ञान कथासंग्रहाचे प्रकाशन डिंपल पब्लिकेशन मुंबई या नामवंत प्रकाशना मार्फत होणार असुन या पुस्तकासाठी प्रसिध्द विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी प्रस्तावना दिली आहे. कोणत्याही पुस्तकाच मुखपृष्ठ हे त्या पुस्तकाचा प्राण असतो. जे मुखपृष्ठ पाहिल्यानंतर वाचक पुस्तका विषयी अंदाज बांधतात. म्हणुन सदर पुस्तकाचे अतिशय देखण मुखपृष्ठ साकारलं आहे ते सुप्रसिद्ध चित्रकार व लेखक सरदार जाधव यांनी. हे मुखपृष्ठ इतकं आकर्षक आहे. की,ते पाहता क्षणी वाचक त्याच्या मोहात पडतो.
तसं आमच्या सरांचा सामाजिक विषयावरील स्मशानातील दारू हा कथासंग्रह प्रकाशित होऊन त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांची आगामी पुस्तके म्हणजे मुंगीचे दूध हा बालकथासंग्रह तसेच बिन आडनावाची पोरी हा सामाजिक विषयावर असलेला कथासंग्रह प्रकाशन मार्गावर आहेत. इथे आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे बिन आडनावाची पोरी या पुस्तकातील शीर्षक कथेचा राज्यस्तरावर पहिला क्रमांक आलेला आहे.
'डम्पी' म्हणजे काय ? असा प्रश्न वाचकाला पडणे साहजिक आहे. पण हे मी तुम्हांला आत्ता सांगणार नाही कारण हेच तर गुपित आहे. त्यामुळे 'डम्पी' म्हणजे काय? हें रहस्य पुस्तक वाचल्या शिवाय तुम्हांला कसं कळणार बरे?
व्यक्ती कोणीही असो! अंतराळ,परग्रहवासी (एलियन ), उडत्या तबकड्या ( यू. एफ. ओ .) ग्रह, तारे यांच्याविषयी त्याला आकर्षण व कुतूहल असतेच असते. तेच कुतूहल हेरून घाटाळ सरांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे.
या कथासंग्रहात एकूण सहा कथा आहेत. सर्वच कथा काल्पनिक आहेत. कथा जरी काल्पनिक असल्या तरी त्यांची नाळ ही विज्ञानाशी जोडली आहे हे मात्र नक्की!
या पुस्तकात डम्पी ही शीर्षक कथा अंतराळ रहस्यकथा असुन तुम्हांला अंतराळाची सफर घडवून आणणारी आहे. राजा सुर्यसेन याची कथा आपले पंचांग कसे आहे हे दर्शवते. दहा वीरबाला ही शौर्यकथा असुन सदर कथेत मुलींचे कर्तव्य आणि देशप्रेम दिसून येते. मात्र शेवटी जेव्हा कथेचे रहस्य कळते तेंव्हा वाचकांना आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही.
या संग्रहातील सर्वात महत्त्वपूर्ण कथा म्हणजे राम्याची दुनिया ही कथा खऱ्याअर्थाने मुलांमध्ये विज्ञान विषयी आवड,कुतूहल तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणारी आहे. या कथेत ग्रामीण भागातील एक मुलगा अतिशय अदभूत असा एक प्रयोग करतो. ज्या प्रयोगाचे नुसते नाव ऐकून लोकांना आश्चर्य वाटते. या प्रयोगामुळे पुढे जे घडते ते अविश्वसनीय आहे. ..
राधाची कमाल कथा आभ्यासात 'ढ' असणाऱ्या एका सामान्य मुलीची कथा आहे. जी करोना सारख्या आजारावर लस शोधते. आता ती लस कशी शोधते याच रहस्य तुम्हांला कथा वाचूनच समजेल. गोष्ट ध्रुवताऱ्याची कथा अदभूत अशी अंतराळ कथा आहे. ही कथा वाचुन अवकाशातील नक्षत्रांविषयी तुम्हांला नक्कीच कुतूहल वाटेल!
आधी सांगितल्या प्रमाणे सदर पुस्तकातील सर्वच कथा काल्पनिक असल्या तरी मुलांमध्ये विज्ञान विषयी आवड व कुतूहल निर्माण करणाऱ्या आहेत. खरंतर या पुस्तकाचा उद्देशच तो आहे. या पुस्तकाद्वारा मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा सरांचा उद्देश सफल होईल अशी मला खात्री आहे. त्यासाठीच सर्वच पालकांना आग्रहाची विनंती की,आपल्या मुलांसाठी हा विज्ञान कथासंग्रह विकत घ्या! कारण पुस्तकाची किंमत फक्त २०० रुपये इतकीच आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अतिशय सोप्या भाषेत असलेले हे पुस्तक मुलांना हमखास आवडेल अशी मला आशा आहे.
प्रा. सुधीर भोईर.

Total Users : 10829