
अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांचे दिवाळीपूर्वीच समायोजन होणार
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
जिल्ह्यातील अनुदानित व अंशत अनुदानित माध्यमिक शाळेत संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे दिवाळीपूर्वीच समायोजन करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला असून तसे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांची शैक्षणिक सत्र 2022-23 ची संचमान्यता काही दिवसांपूर्वी वितरीत करून अतिरिक्त व रिक्त पदांची माहिती घेतली होती. काही शाळांमध्ये बर्याच वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने व शासनाकडून भरती बंदी असल्याने ही पदे शाळांना भरता आली नाही.
परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी सातत्याने शिक्षक संघटना व संस्था चालकांकडून केल्या जात होती. teachers appointed अखेर शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचे वेळापत्रक 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केले आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे संस्थाअंतर्गत समायोजन करणे, 13 ऑक्टोबरपर्यंत अतिरिक्त व रिक्त पदांची माहिती सादर करणे, 18 पर्यंत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करणे, 20 पर्यंत प्रकाशित यादीवर आक्षेप मागविण्यात येणार आहे. 23 रोजी या आक्षेपांवर सुनावणी होईल. 27 रोजी अतिरिक्त शिक्षक अंतिम यादी व रिक्त जागा जाहीर केल्या जाणार असून 31 ऑक्टोबर रोजी समायोजन समुपदेशन पद्धतीने होईल.
समायोजनात पारदर्शकता राहील का?माध्यमिक शाळेतून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन 31 ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी समुपदेशन पद्धतीने होणार आहे. यापूर्वी झालेल्या समायोजन प्रक्रियेवर उलटसुलट चर्चा झाली होती. त्यामुळे यावेळी या प्रक्रियेत पारदर्शकता राहील का? असा प्रश्न आहे. दरम्यान, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन रिक्त जागांवर नियमानुसार व पारदर्शकता ठेवून केले जाईल, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांनी शिक्षक संघटनांना सांगून आश्वस्त केले आहे.
Total Users : 10829