
जव्हार तालुक्यातील १५ गावांतील बावीस हजार नागरिक मोबाईल कव्हरेजविनाच
जव्हार :ji 2 4 news सुनिल जाबर.
जव्हार तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती ही डोंगर दऱ्या, चढ उतार अश्या स्वरूपाची आहे, त्यामुळे या भागात पायाभूत सुविधा पोहचवणे शासन प्रशासनाला अतिशय जोखमीचे ठरत आहे, हे असले तरी, या भागात उपाययोजना व्हाव्यात म्हणून आजपावेतो करोडो रुपये खर्च झाले आहेत, परंतु परिस्थिती जैसे थे आहे, वास्तविक पाहता डिजिटल इंडियाच्या दुनियेत तालुक्यातील अनेक गावांत मोबाईल कव्हरेज असणे अत्यावश्यक होते परंतु, तालुक्यातील १५ गावे आणि २२ हजार ४१० नागरिक हे अद्यापही विनाकवरेज असल्याने ही गावे संपर्कापासून कोसो दूर राहिले आहेत.
सद्यस्थितीत एकीकडे जग दूरसंचार क्षेत्रात प्रगती करत असताना टूजी, थ्री जी, फोर जीनंतर आता ५ जीचा वेगही इंटरनेटेने गाठला आहे. पण दुसरीकडे तालुक्यातील १५ गावांतील नागरिक मोबाईल कव्हरेजपासून वंचित आहेत. त्यामुळे येथे इंटरनेट सुविधा, तर सोडाच पण मोबाईलवरून संवाद साधण्याचीही सोय नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
जव्हार तालुका अतिदुर्गम असून काही गावांत इंटरनेट तर दूरच पण साधे मोबाईल कव्हरेज नसल्याने तालुक्यातील १५ गावे आजही मोबाईल कव्हरेजपासून कोसो दूर आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील लोकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. नीट रस्ते नाहीत,आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत ,मग इंटरनेट सुविधा कुठून मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
तालुक्यातील काही गावे भ्रमणध्वनी मनोऱ्यापासून लांबच आहेत. मग नेटवर्क नसल्याने येथील नागरिकांना साधा संवादही आपल्या भ्रमणध्वनीद्वारे साधता येत नाही. बोटावर मोजता येईल तेवढ्याच गावांत इंटरनेट सुविधा होते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या मेहनतीच्या पैशांतून विकत घेतलेले मोबाईल आता शोपीस आणि मुलांचे खेळणे बनले आहे. शिवाय, तालुक्यातील अनेक गावांत ऑनलाइन काम करताना मोठी अडचण निर्माण होते.
कोट ( चौकट )
मोबाईल सध्या चैनीची वस्तू नाही, तर धावपळीच्या जीवनात मोबाईलला जीवनावश्यक वस्तूप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच मोबाईल आज घराघरांत अत्यावश्यक झाले आहेत. जव्हार तालुक्यात अनेक ठिकाणी ही समस्या असल्याने ग्रामीण भागांत जवळपास १५ ते २० गावांत भ्रमणध्वनी मनोरा उभारण्याची नितांत गरज असून ,मी राज्य शासनाकडे मागणी केली आहे.
सुनील भुसारा, विक्रमगड विधानसभा आमदार
कोट
जव्हार तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क नसलेल्या गावांची यादी वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आली असून संबंधित ठिकाणी मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत.
लता धोत्रे, तहसीलदार जव्हार
Total Users : 10829