
वेणी गावात मतदान व मतदार जनजागृती रॅली..
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी - वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वेणी गावात वडणेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळाच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. रॅलीला हिरवी झेंडी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, सरपंच अमोल दुरतकर, पोलिस पाटील सुभाष उगे, डॉ. पंकज मून यांनी दाखवली प्रसंगी राहुल दुरतकर, सचिन महाजन रॅलीचे संयोजक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश बहादे व निवडणूक साक्षरता मंडळ नोडल अधिकारी डॉ. विनोद मुडे उपस्थित होते.
मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी भव्य मतदान नोंदणी व मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये निवडणूक साक्षरता क्लबचे सदस्य व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात सहभागी होते, ‘तोच देश होईल महान, ज्या देशात १०० % मतदान’ अशा अनेक घोषवाक्य असलेले फलक आणि विविध घोषणांनी रॅलीकडे वेणी गावातील ग्रामस्थांनी लक्ष वेधून घेतले.
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषतः निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. असे विचार रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी यांनी मांडले.
रॅलीचे संचालन नोडल अधिकारी डॉ. विनोद मुडे व आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश बहादे यांनी केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी कु. स्वाती सुपारे, नेहा येलके, वैष्णवी खोडे, चेतन साटोने, अभय पोहाणे, हंसराज काटकर, भाग्यश्री मुन, वैष्णवी तुमसरे, रिक्की मुन, प्रफुल शिंदे, मयुरी डोळसकर, दिव्याभारती अवचट, रक्षा वाटे, कनक चतारे, अश्विनी निरसकर, भावना राऊत, रुचीता वेले, सुहानी कोल्हे, स्नेहल अवचट, प्रांजली नेटे, प्रियंका वरघने, हर्षदा महाजन, पल्लवी पिंपळशेंडे, आचल बडवाईक, वैष्णवी चिमने, काजल भारस्करे, आचल निकेसर अथक परिश्रम घेतले.
Total Users : 10829