
साप्ताहिक - माझं गाव माझं शहरच्या बातमीची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतली दखल... अखेर घानवळची खंडित बससेवा पूर्ववत..
मोखाडा ग्रामीण - सचिन वझरे
पिंपळपाडा - घानवळ घाटरस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे भर पावसाळ्यात दोन महिने मोखाडा - बलद्याचापाडा बससेवा अपघाताची शक्यता म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहनच्या जव्हार आगाराने खंडित केली होती.
या खंडित बससेवेमुळे विद्यार्थी, नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. महाराष्ट्र राज्य परिवहनच्या जव्हार आगार यांच्यासोबत पत्र व्यवहार केला असता सदरचा घाट रस्ता हा दुर्घटनाग्रस्त असून या अगोदरही अनेक बस या रस्त्यावर नादुरुस्त झालेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अपघातग्रस्त खड्डे बुजावल्याशिवाय बससेवा सुरू करता येणार नाही असा पवित्रा जव्हार आगाराच्या व्यवस्थापन विभागाने घेतला होता.
रस्ता दुरुस्ती बाबत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग - मोखाडा यांच्यासोबत तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग - मोखाडा यांच्याशी संपर्क साधला असता सदरचा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असल्यामुळे या रस्त्यावर आम्हाला दुरुस्ती करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम बघणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधला असता त्यांनी पावसाळा असल्यामुळे काम थांबले असून पाऊस उघडताच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे दोन महिने खंडित बस सेवा पुर्ववत करायची कशी? असा यक्ष प्रश्न घानवळच्या ग्रामस्थांसमोर होता. ते सातत्याने पिंपळपाडा - घानवळ घाट रस्त्यावरील धोकादायक खड्डे श्रमदानाने बुजवत होते. या खंडित बस सेवेची व ग्रामस्थांनी खड्डे बुजवल्याची बातमी साप्ताहिक - माझंगाव माझं शहर यांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जव्हार आगाराने या बातम्यांची दखल घेतली.
अखेर भर पावसाळ्यातील दोन महिन्यांची खंडित बससेवा घानवळ ग्रामस्थांसाठी पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक यांना दिलासा मिळाला असून त्यांनी श्रमदान करणाऱ्या व बससेवा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सचिन वझरे,कृष्णा राबडे, रेवनीनाथ भांगरे,निवृत्ती भांगरे, रोशन गाडर,अमृत शिंपी,मेघनाथ बात्रे,रामजी नडगे, रघुनाथ पडघे, विद्यार्थी आणि साप्ताहिक माझं गाव, माझं शहर यांचे आभार मानले.
Total Users : 10829