
शिक्षक भारतीच्या वतीने कोकण शिक्षक मतदार संघातून धनाजी पाटील यांची उमेदवारी जाहीर.!
पालघर जिल्हा ;प्रतिनिधि – पालघर जिल्हाअध्यक्ष शिक्षक भारती -अनिल शेलार :-
शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या मुंबई येथील सभेमध्ये विधान परिषदेच्या आगामी कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवार म्हणून शिक्षकांचे जेष्ठ नेते व शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडणूक येत्या जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.
हा निर्णय शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे व शिक्षक आमदार कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेसाठी राज्यातील सर्व विभागातील पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबरोबरच आगामी होऊ घातलेल्या विदर्भ व कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवारीबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्यानुसार विदर्भ आणि कोकण विभागासाठी अनुक्रमे राजेंद्र झाडे व धनाजी पाटील यांच्या नावाची शिफारस एकमताने मंजूर करण्यात आली.
कोकण विभागासाठी धनाजी पाटील यांच्या नावाची सूचना राज्याचे प्रमुख कार्यवाह व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वेतुरेकर सर यांनी केली. यावेळी राज्य अध्यक्ष श्री बेलसरे सर यांनी व्यक्त केलेले मतानंतर सर्वांच्या संमतीने व एकमताने धनाजी पाटील यांची उमेदवारी एकमताने मंजूर करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा देण्यात आल्या.
या सभेसाठी ठाणे जिल्हाध्यक्ष एकनाथ तारमळे, पालघरचे जिल्हाध्यक्ष अनिल शेलार, दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ म्हात्रे, रत्नागिरीचे कार्यवाह निलेश कुंभार आणि शिक्षक भारतीच्या उर्दू विभागाचे अध्यक्ष मुस्ताक पटेल,राज्य सचिव मोबीन बामणे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार धनाजी पाटील हे गेल्या 33 वर्षांपासून शिक्षक चळवळीमध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. शासन निर्णय, न्यायालय निवाडे व शिक्षकासाठी असलेले विविध कायदे यांचे एक गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. शिक्षकांसाठी मार्गदर्शन करणारा एक गाढा अभ्यासक म्हणून त्यांची राज्यभर ओळख झालेली आहे. अत्यंत अभ्यासू पद्धतीने मार्गदर्शन करून शिक्षकांना न्याय प्राप्त देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न राहिला आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षण विभागात अत्यंत आक्रमकपणे आणि अभ्यासूपणे पाठपुरावा करणारे नेते म्हणून त्यांचा सर्वत्र परिचय आहे. सहाजिकच केवळ शिक्षकासाठीच दीर्घकाळ कार्यरत असलेल्या धनाजी पाटील यांच्यासारख्या शिक्षक नेत्याला उमेदवारी देऊन एका कार्यक्षम कार्यकर्त्याला न्याय दिला आहे अशीच भावना शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षातील आंदोलनादरम्यान शिक्षकांना आलेले अनुभव व शासनाकडून होणारी हेळसांड पहाता सध्या राज्यभर शिक्षक मतदार संघातुन निवडून येणारा आमदार हा शिक्षकांपैकीच असावा या विचाराने शिक्षकांमध्ये जोरात मूळ पकडले आहे. शिक्षकासाठी जुनी पेन्शन योजना, शिक्षक संचमान्यता निकषात बदल, नवीन शिक्षक भरती व शिक्षण विभागाचा चाललेला सध्याचा ढिसाळ कारभार यासारख्या गंभीर प्रश्नाबाबत सध्याची असलेली अनास्था दूर करण्यासाठी शिक्षक चळवळीतील कार्यकर्ताच शिक्षक आमदार बनला पाहिजे या भूमिकेने शिक्षक वर्गात जोर पकडलेला आहे.
त्यामुळे यावेळेला शिक्षक संघटनांचाच शिक्षक मतदारसंघात बोलबाला दिसेल असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर गेली तेहतीस वर्ष शिक्षक चळवळीमध्ये अत्यंत अभ्यासू पद्धतीने शिक्षकांना मार्गदर्शन करणारे
व शिक्षकांच्या प्रश्नावर सर्वच आंदोलनात अग्रभागी राहून प्रत्यक्ष भाग घेणारे आणि शिक्षकांची पत व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या धनाजी पाटील यांच्या रूपाने उमेदवारी दिलेल्या कार्यकर्त्याला शिक्षक निश्चितच न्याय देतील असे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान शिक्षक भारतीने धनाजी पाटील यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल शिक्षकांमधून उत्फुर्तपणे आनंद व्यक्त केला जात आहे.
शिक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल.
शिक्षक मतदारसंघात मला शिक्षक भारतीचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब व अध्यक्ष अशोक बेलसरे सर यांच्या रूपाने उत्तुंग व्यक्तिमत्व मिळालेले आहे.
या नेतृत्वाच्या साथीने व इतर जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सक्रीय पाठिंबामुळे कोकण विभाग शिक्षक मतदार संघातून विजयाची खात्री आहे.
सुमारे तेहतीस वर्ष केवळ शिक्षकांची पत व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी, विविध समस्यांच्या निराकरणासाठी आणि संघटनात्मक चळवळीमध्ये अखंडपणे काम केल्यानंतर शिक्षकांचा मिळणारा मोठा पाठिंबा हा निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे माझ्या विजयाच्या वाटचालीस यशस्वी चालना मिळेल याची खात्री आहे. कोकण शिक्षक मतदार संघात शिक्षक भारतीचाच विजय झालेला दिसेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिक्रिया उमेदवार धनाजी पाटील यांनी दिली आहे.
Total Users : 10829