
मोखाडा तालुक्यातील घानवळच्या गाडर कुटुंबियांनी जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बुजवले रस्त्यावरील खड्डे…
जोहार इंडिया न्यूज 24 (मोखाडा प्रतिनिधी )
पालघर जिल्हा व मोखाडा तालुक्यातील शेवटचे महसूली गाव – घानवळ असून या गावात तीन पाड्यांचा समावेश आहे. घानवळ गाव हिरवे – घानवळ ग्रुप-ग्रामपंचायत अंतर्गत येत आहे. घानवळ गावाला रस्ता मोरचोंडी येथून सुरू होतो. हा पालघर – नाशिक जिल्ह्याला जोडणारा असून नाशिक जिल्ह्यातील हरसूल या बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांसाठी खुप जवळचा आणि कमी अंतराचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याला कायम वाहनांची वर्दळ असते.
या गावाला जाताना तीन किलोमीटरच्या पिंपळपाडा ते घानवळ रस्त्यामध्ये दीड किलोमीटरचा तीव्र घाट रस्ता असून घाटात अनेक नागमोडी वळणे आहेत.सध्या या रस्त्याची पावसामुळे दुरावस्था झाली असून रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे वाहनचालकांना कायम या रस्त्याने प्रवास करताना खबरदारी बाळगून आणि जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावरील घासतेल्या आंब्याचे नागमोडी वळणावर रस्त्याला गटार नसल्याने रस्त्यावरुन पाणी जाऊन अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे लहान वाहनचालकांबरोबरच महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहनच्या,स्वस्त धान्य दुकानाची मालवाहू गाडी यांना देखील मार्गक्रमण करताना त्रास होत होता.त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी घानवळच्या गाडर कुटुंबियांनी जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांतीदिनाच्या पूर्व संध्येला हे खड्डे बुजवले आहेत.
या खड्डे बुजवण्याकामी रामदास गाडर सर यांना त्यांच्या पत्नी सौ.गाडर या बरोबरच स्केटिंग खेळात प्रभाव पाडणाऱ्या कु.दक्षतनया व उत्कर्षा या मुलींचे सहकार्य लाभले.
Total Users : 10829