
वस्तीशाळेच्या अविनाशला अर्जुन पुरस्कार …
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
अविनाश साबळे वस्तीशाळेचा विद्यार्थी. बीडच्या जि. प. प्रा. शाळा धनगरवस्ती, मु. पो. मांडवी, ता. आष्टी इथं त्याने चौथी पर्यंतचं शिक्षण घेतलं. या शाळेतील शिक्षक हनुमंत मुटकुळे सरांनी अविनाशला हेरलं. संधी दिली. धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यायला सांगितला. सराव करून घेतला. पण त्या सोबतच त्याची जिद्द, मेहनत यामुळे आज अविनाश कुठल्याकुठे गेला आहे.
नुकताच अविनाश साबळेला भारत सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना कठीण परिस्थितीवर मात करत अविनाशची ही मजल लक्षवेधी आहे.

दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. तर बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्य पदक मिळवलं. याशिवाय या क्रीडा प्रकारातले अनेक राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहेत.
अडथळ्यांची शर्यत पार करत अविनाशने गाठलेला हा देदिप्यमान पल्ला सर्वांना प्रेरणादायी आहे.
अविनाश साबळेचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
– आमदार कपिल पाटील.

Total Users : 10829