
वीट भट्टीवरील मजूरांची व्यथा…
जोहार इंडिया न्यूज 24 .प्रा.दिनेश राठोड (वर्धा जिल्हा – प्रतिनिधी)
दरवर्षी यवतमाळ जिल्ह्यातील काही मजुर विटभट्टीचे काम करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात येत असतात. इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात रोजगार मिळवण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
वीटभट्टी मजूरांची व्यथा…
दुसऱ्यांचे घर उभारण्यासाठी मजबूत वीट निर्माण करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे यवतमाळ जिल्ह्यातील वीट भट्टीत काम करणारे मजूर दरवर्षी वर्धा जिल्ह्यात येत असतात. या वीट भट्टीच्या कामावर वीट मजूर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्षभर चालवतात. स्थलांतरीत वीटभट्टी कामगारांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, व्यसनाधिनता आदी गंभीर प्रश्न असून, त्यांचे आयुष्य उध्वस्त होत चालले आहे. वीट भट्ट्यांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील वातावरण पोषक आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वीटभट्टी उद्योग मोठ्याप्रमाणात उभारण्यात येतात. मात्र या उद्योगावर काम करण्यासाठी लागणारे मजूर हे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत आणि झाले तरी त्यांच्या समस्या अधिक असतात.
त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत. जाणून घेऊया…
अनेक कुटुंब वीट भट्टीवर विटा तयार करण्यासाठी माती तयार करतात. त्यानंतर विटा थापुन तयार केल्या जातात. मग विटांची भट्टी लावली जाते. कुटुंबाचा उदर्निवाह करण्याकरिता एका जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात काम करण्यासाठी हे संपूर्ण कुटुंब स्थानांतरित होत असतात. आपल्या परिवारातील सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चार ते पाच महिने असे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह वर्धा जिल्ह्यात येतात. वीटभट्टी कामगारांना हजार विटांमागे ३०० ते ५०० रुपये दिले जातात. एक हजार विटा काढण्यासाठी वीटभट्टी मजूरांना दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो.
विदर्भात सर्वाधिक औष्णिक विद्युत प्रकल्प असल्याने त्यातून निघणारी राख वीटभट्टी उद्योगांना मोफतमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे वीटभट्टी हा नफ्याचा धंदा म्हणून करण्यावर सर्वांचा भर असतो मात्र वीटभट्टी कामगारांच्या समस्यांकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे त्यांचे एक प्रकारे शोषणच होत आहे. त्याचप्रमाणे वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. वीटभट्टीवर राहून ती मुले बालमजुरीकडेही वळतात. त्यामुळे या वीटभट्टी मजूरांचा शासनाने सर्वोतोपरी विचार करणे गरजेचे आहे.

Total Users : 10829