
एन्डुरन्स चॅलेंज स्केटिंगच्या राष्ट्रीय पातळीवर दक्षतनया गाडर हिने पटकावले ब्रॉन्झ मेडल्स…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी – मोखाडा
मोखाडा – एन्डुरन्स नॅशनल चॅलेंज – इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग स्पर्धा 18 व 19 फेब्रुवारी रोजी खोपोली येथे स्केटिंग रिंकवर आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत राज्यपातळीवरील विविध वयोगटाचे व विविध राज्यांचे शेकडो मेडलिस्ट स्केटर्स हे राष्ट्रीय पातळीकरिता सहभागी झाले होते. या स्केटिंग स्पर्धेत कु.दक्षतनया रामदास गाडर हिने 12 वर्षे वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना 1 मिनिट व 20 सेकंदच्या रेसमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल्स मिळवले आहेत. दोन दिवस चाललेल्या स्केटिंग स्पर्धा रखरखत्या उन्हात देखील सुरू होत्या.त्यामुळे भर उन्हात दर्जेदार कामगिरी करणे स्केटर्ससाठी एक मोठे आव्हान होते. या रेसेसमध्ये खेळाडूंच्या क्षमतांचा प्रचंड कस लागला.
कु.दक्षतनया गाडर हिच्या या कामगिरीमुळे मोखाडा तालुका,पालघर जिल्हा व पर्यायाने महाराष्ट्र राज्य यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिच्या अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धा या थायलंड या ठिकाणी होणार असून सध्या ती सागर स्केटिंग अकॅडेमीचे प्रशिक्षक – श्री.कुलदीप सागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग धडे गिरवत आहे.

Total Users : 10829