
जि.प.प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास विलंब शिक्षक हवालदिल…
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
शासनाच्या धोरणामुळे मागील कित्येक महिने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास सातत्याने विलंब होत आहे. कधीकाळी महिन्याच्या पाच तारखेपूर्वी होणारे वेतन आता तीन-तीन आठवडे 25 तारीख येऊनही होत नाही.
शिक्षकांनी आंदोलन करूनही शासन स्तरावर कमालीचे औदासिन्य आहे. हा प्रकार संतापजनक असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी कळवले आहे.
वर्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे जानेवारी देय फेब्रुवारी महिन्याचे वेतन 25 तारीख येऊनही झालेले नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने जबाबदार असणार्या सर्व यंत्रणेचा जाहीर निषेध केला आहे. वेतनासाठी विकसित केलेल्या शालार्थ प्रणालीसह बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येणारी झेड पी एफ एम एस दोन्ही प्रणाली अपयशी ठरल्याने पूर्ववत जुन्या पद्धतीने ऑफलाईन वेतन करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने केली आहे.
जानेवारी महिन्याच्या वेतनासाठी अनुदान आल्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध झाली. 11, 12 कार्यालयीन सुट्टी झाल्यावर 13 रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण, वित्त विभागातील कार्यवाही होऊन कोषागार कार्यालयात 14 रोजी वेतन देयके पाठविण्यात आली. विलंब होत असल्याने त्या स्तरावरील कार्यवाही लवकर होण्याची अपेक्षा असताना कोषागार विभागाने संवेदनशीलता न दाखवता नेहमीप्रमाणे चार दिवस प्रक्रिया चालवली. 18,19 फेब्रुवारी सुट्टीनंतर 20 रोजी देयके मंजूर केली. 21 फेब्रुवारी रोजी मंजुरी पत्र पाठविले. 21 फेब्रुवारी रोजी झएडपीएफएमएसचे संकेतस्थळ बंद होते. शिक्षण व वित्त विभागाने 22 फेब्रुवारी रोजी कार्यवाही करून 23 फेब्रुवारी रोजी स्टेट बँकेला धनादेश पाठवला. स्टेट बँकेने ताबडतोब धनादेश क्लिअर केला. परंतु, बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात यायची कार्यवाही न झाल्याने शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजीपर्यंत प्राथमिक शिक्षकांचे वेतन होऊ शकले नाही.
शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न शासन, कोषागार विभाग व संबंधित बँक ऑफ महाराष्ट्र, शासन स्तरावरून नेमलेली एजन्सी गांभीर्याने घेत नसल्याने सतत विलंब होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचे व प्रलंबित प्रश्नांचे कुणालाही सोयरसुतक नसल्याची विदारक आणि निषेधार्थ स्थिती आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी व्यक्त केली.
Total Users : 10829