
करियर मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन…..
प्रा.दिनेश राठोड ji24news/जिल्हा प्रतिनिधी वर्धा
नजिकच्या हिंगणघाट तालुक्यातील नवकेतन विद्यालय जामनी येथे दिनांक 15 जून 2023 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना अपेक्षेएवढे गुण मिळतातच असे नाही. कमी गुण मिळूनही करिअरच्या विविध वाटा कोणत्या, एखादे क्षेत्र निवडताना त्याबद्दलची माहिती कशी मिळवावी याचे संपूर्ण मार्गदर्शन ‘उज्वल भविष्यासाठी…’ या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना मिळाले. या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाय.के. कलोडे यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळखही या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना झाली. आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी? करिअरच्या अवघड टप्प्यांवर कोणत्या गोष्टींचा विचार करावा? कमी गुणांतील करिअरचे विविध पर्याय कोणते? या विषयांवर करिअर समुपदेशक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.श्री दिनेश राठोड यांनी उपस्थित विदयार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधला.
सध्याच्या युगात इंटरनेट व डिजिटल मीडिया आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. इंटरनेट व सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात अमाप संधी सध्या उपलब्ध झाल्या आहेत. असे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे स.शी.श्री ओंकार मडावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘संभाषण चातुर्य’ हे विशेष कौशल्य सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे. आजच्या जगात प्रभावी संभाषण हेच प्रगतीचे उत्तम साधन आहे. सूत्रसंचालन-निवेदन, व्यावसायिक वक्ता, मॅनेजमेंट व मोटिव्हेशनल प्रशिक्षक या विविध करिअरची भुरळ अनेकांना सध्या पडते आहे. ‘संभाषण चातुर्य प्रशिक्षक’ याविषयी माहिती दिली.
करिअर निवडताना येणारा ताण, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, त्यात कमी मार्कांमुळे असलेली निराशा व डळमळीत आत्मविश्वास यावर उपस्थित विद्यार्थ्यांना ‘मार्क नव्हे तर जिद्द ठरवते यश’ या विषयावर पालकांचे प्रतिनिधी श्री श्रावण लेदाडे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सोबत व्यवसाय शिक्षण व कौशल्य विकास प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबिवण्यात येणाऱ्या अनेक अभ्यासक्रमांची माहिती या कार्यक्रमात तज्ञांनी उपस्थितांना दिली.या कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी श्री यशवंतराव भोयर,रमेशराव बोकडे,श्री गजाननराव लाखे,सौ.सविता उईके,सौ शालू उईके,सौ.कल्पना मसराम व शिक्षकेतर कर्मचारी श्री इंगोले ,श्री मानकर सौ.शोभाताई तसेच अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Total Users : 10828