
पाटीलपाडा/दरंबेचापाडा/ महालेपाडा(खुडेद)गावाची माहिती...
प्रतिनिधी -दिपक भोये विक्रमगड
विक्रमगड ; २०० ते २५० वर्षापूर्वी ज्या भागात खुडेद गाव पाटीलपाडा या नावाने वसले होते. ते गावदेवी मंदिराच्या दक्षिण बाजूला अंदाजे १०० मीटर अंतरावर सपाट जागेवर होते.पाटीलपाडा/खुडेद गावठण चे पूर्वेला ५० मीटर अंतरावर खुडेद दहाड आहे आणि खुडेद दहाडाचे उत्तरेला व गावदेवी मंदिराच्या पूर्वेला असलेल्या दहाडाच्या परिसरात त्यावेळी भरपूर रानटी डुक्कर राहायचे म्हणून त्या दहाडास डुकरेचा दहाड म्हणून ओळखले जाते. हा परिसर पूर्वीचे घनदाट जंगल क्षेत्र असल्याने त्यामध्ये वन्य प्राण्यांचे देखील वास्तव्य होते.येथील लोकवस्तीचे पूर्वी गुजरात मधील डांग, फिरंगा ,वलसाड तसेच दमण,दिव व दादरा आणि नगर हवेली मधील खाणवेल,दुधनी, जूनागेट आणि सेलवास विभागातील काही गावातील ग्रामस्थांनी तेथील तत्कालीन रोगराई व त्या भागातील पारसी लोकांच्या त्रासाला कंटाळून स्थलांतर केले आणि शेती व शेतीपूरक कामधंद्यासाठी येथे स्थायिक झाले.त्यामध्ये वायाड,पाटारा,कडू ,बरफ आणि त्यांच्या जवळच्या ओळखीचे असलेले काही कुटुंब आपापल्या परिवारासह खुडेद गावाचे जुने गावठण येथे स्थायिक झाले.त्यावेळी त्या वस्तीला पाटीलपाडा या नावानेच ओळखले जात होते.त्यानंतर काही वर्षांनी साखरे हद्दीतून आंबिदा दहाड मार्गाने खुडेद/ पाटीलपाडा जुने गावठण कडे येणारा रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले आणि रस्त्याचे हे काम कुंडाचापाडा येथील रहिवासी असलेल्या गायकवाड यांच्या सध्याच्या असलेल्या मालकी जागेच्या हद्दीत जुने गावठण पासून दक्षिणेला अंदाजे १५० ते २०० मीटर अंतरावर रस्त्याचे हे काम पूर्ण होत असतानाच जुने गावठण पाटीलपाडा/खुडेद या गावावर भयंकर महामारीची साथ आली.या महामारीच्या कालावधीत दररोज १-२ माणसे रोगराई व इतर कारणाने मरू लागली.या सर्व प्रकाराला घाबरून खुडेदचे जुने गावठण पाटीलपाडा येथून लोकांची आपापल्या परिवारासह पळापळ सुरू झाली.प्रत्येकाने आपापल्या शेती करण्याचे हक्काचे जागेत जाऊन झोपड्या बांधून वस्ती मांडली तर काही कुटुंबांनी खुडेद पाटीलपाडा गावठण चे उत्तरेला अंदाजे ५००-६०० मीटर अंतरावर असलेल्या उंबरपाडा/मोठापाडा(आताचा बोरसेपाडा) येथील वस्तीत जाऊन झोपड्या बांधून राहू लागले.तसेच वायाड,पाटारा,महाले,कडू व इतर कुटुंबांची शेती करण्याची हक्काची जागा ही जुने गावठण लगत असल्याने त्याच परिसरात राहणे धोक्याचे समजून जुने गावठण चे पूर्वेला असलेल्या गायरान जागेत अंदाजे ६०० मीटर अंतरावर दरंबेवर जाऊन झोपड्या बांधून वस्ती मांडली.त्यामुळे गायरान जागेत दरंबेवर नवीन वस्ती असलेल्या मूळच्या खुडेद/पाटीलपाडा या पाड्यास दरंबेचापाडा या नावाने ओळखले जाऊ लागले.मुळगाव खुडेद/पाटीलपाडा असलेल्या दरंबेच्यापाड्यात १९५० मध्ये पहिली प्राथमिक शाळा खुडेद या गावाच्या नावाने स्थापन झाली.त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी १९५८ मध्ये बारा पाड्यांचा महसुली गाव असलेल्या खुडेद गावाच्या नावाने ग्रामपंचायत ची स्थापना झाली.खुडेद /पाटीलपाडा चे जुने गावठण मधील महामारीला घाबरून दरंबेचापाडा(नवीन नाव महालेपाडा) या ठिकाणी नव्याने लोकवस्ती केलेल्या ६-७ कुटुंबांचे आजच्या घडीला ७५ घरांची वस्ती झालेली असून सध्या येथे १०६ कुटुंब गुण्यागोविंदाने राहत आहेत.
खुडेद ग्रामपंचायत मध्ये आता पर्यंत वेगवेगळ्या पाड्यांचे अनेक सरपंच होऊन गेले त्यापैकी महालेपाडा येथील बाबू चौधरी,गणपत महाले, लक्ष्मण महाले, सुनीता महाले,वनिता नडगे,लहू नडगे असे आता पर्यंत महालेपाडा येथील सरपंच झालेले आहेत.यामध्ये लहू नडगे हे सध्याचे सरपंच असून ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंतचे सरपंच मधील सर्वात कमी वयाचे,पदवी पर्यंत शिक्षण झालेले,विविध कायद्यांचे तसेच विविध शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती असलेले,अत्यंत गरीब कुटुंबातून, थेट सरपंच निवडणुकीतून पहिल्यांदा निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवारीत पहिल्याच प्रयत्नात भरघोस मतांनी निवडून आलेले तरुण तडफदार सरपंच म्हणून संपूर्ण विक्रमगड तालुक्यात त्यांची चांगली ओळख आहे. त्यापैकीच गणपत महाले यांनी देखील सन १९६८-६९ ते सन १९८२-८३ या कालावधीत सलग तीन वेळा निवडून येऊन सतत १५ वर्षे सरपंच पदाचा कारभार उत्तम पद्धतीने पाहिला होता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून त्यांना पंचायत समिती स्तरावर जव्हार येथे आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.त्यानंतर खुडेद/दरंबेचापाडा या गावास महालेपाडा या नावाने नवीन ओळख निर्माण झाली.पूर्वीपासून आजपर्यंत महालेपाडा गावातील महाले कुळ घरण्यास मानाचे स्थान आहे.पूर्वीपासून महाले कुळाच्या घरातच गावचा सार्वजनिक गणपती उत्सव, श्रीकृष्ण जयंती उत्सव, गावकीचे जागरण इत्यादी सण उत्सव केले जायचे.तसेच होळीच्या सणाला होलिका दहन करण्याचा आणि दसऱ्याच्या सणाला रावण दहन करण्याचा महाले कुळाच्या घराण्यास पूर्वीपासून कायमचा मान आहे.
महालेपाडा येथे दर गुरुवारी सायंकाळी सात वाजता गणपती मंदिरात श्री नरेंद्र महाराजांच्या आरतीचा कार्यक्रम होतो.येथील बहुतेक कुटुंबाकडे थोड्याफार प्रमाणात शेती असल्याने येथील शेतकरी संघटित असून शेतकऱ्यांचे तीन शेतकरी मंडळ आहेत.त्यापैकीच धरतरी शेतकरी मंडळ हे सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत.तसेच येथील महिलांचे देखील सहा बचत गट स्थापन केलेले आहेत. त्यामध्ये महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून देण्याचे काम चालू आहे.
गावालगत तीन सिमेंट बंधारे आहेत त्यामधील पाणी मार्च महिन्यापर्यंत राहते.पिण्याच्या पाण्यासाठी तीन सार्वजनिक विहिरी आणि चार सार्वजनिक बोअरवेल आहेत.विहिरींचे पाणी मार्च महिन्यापर्यंत राहते आणि चार सार्वजनिक बोअरवेलला एकदम थोडे पाणी असल्याने येथे मार्च महिन्यानंतर पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होते.
महालेपाडा येथे स्थायिक असलेल्या कुटुंबांपैकी महाले, वायाड,पाटारा,कडू, हरपाले, गरेल,खांजोडे,बरफ, काकवा, घाटाळ,मोरे,वळवी, नडगे, वैजल, फडवळे,पांढरा,बरतडे या कुळांची वारली जमातीची आणि चौधरी,पालवी,पवार,खुरकुटे, बोरसे,शेंडे या कुळांची कोकणा जमातीची .अशा दोनच जमातीचा समाज येथे राहत आहे.त्यापैकी ९७% वारली तर ३% कोकणा समाजाचे कुटुंबांची लोकवस्ती येथे आहे.येथे कोवळी भाजी, खादीचा देव, वाघ बारस, शिमगा, रवाळ देव, तोरण देव, गाव जागरण, वाडीचा देव, नाग पंचमी, श्रीकृष्ण जयंती,गणपती उत्सव,दसरा, दिवाळी,माघी गणेश उत्सव, होळी गुढीपाडवा, श्रीराम नवमी, आखाती इत्यादी सण, उत्सव मोठ्या उत्साहाने सर्वजण एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने साजरा केले जातात.येथे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने गरोदर महिलेचे बाळंतपण करणाऱ्या महिला,देवकार्य/ मयतकार्य करणारे भगत, रूढी,प्रथा, परंपरा आणि संस्कृती जतन व संवर्धन करणारे, सांबळ वादक,ढोल वादक तसेच तारपा वादक, देखील आहेत.यामध्ये शांती गणपत महाले,जानू घाटाळ, दिवाळ हरपाले,शंकर पालवी, चंद्रकांत मोरे,जितेंद्र गरेल, नवसु बरफ,सुनील खांजोडे,संतोष फडवळे, सावंजी कडू,नाना वळवी,रामा कडू,राजू कडू,दिनकर चौधरी आणि शेवंती राघो पवार यांचे विशेष योगदान आहे.
येथील जिल्हा परिषद शाळा चौथी पर्यंतच आहे.त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना साखरे, विक्रमगड आणि जव्हार या ठिकाणी जावे लागते.सद्यस्थितीत गावाचे हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र ,बहुद्देशीय केंद्र,समाजमंदिर,जुने ग्रामपंचायत कार्यालय,पोस्ट ऑफीस, गावदेवी मंदिर तसेच गणपती मंदिर आहे.गावात लाईटची सोय आहे,पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी आहेत .गावातील विद्युत खांबांवर दिवाबत्तीची सोय आहे.महालेपाडा येथे वारकरी पंथ,श्री समर्थ रामदास स्वामींची श्री सद्गुरू बैठक तसेच श्री नरेंद्र महाराजांचा श्री संप्रदाय पंथ.या तिन्ही पंथात जाणारी भक्तगण मंडळी बहुसंख्येने असल्याने येथे ९५% व्यसनमुक्त व तंटामुक्त गाव आहे .तसेच महालेपाडा येथे १८/०१/२०१५ मध्ये तत्कालीन आदिवासी विकास व सामाजिक न्याय,कॅबिनेट मंत्री माननीय विष्णुजी सवरा साहेब यांच्या उपस्थितीत महालेपाडा गावाने गावात होणाऱ्या लग्नकार्यातील मानपान (वधू किंवा वराला आहेर करणाऱ्या व्यक्तीस मान म्हणून कपडा आणि दारू देणे) या बहुखर्चिक गावकीच्या कायद्यास कायमची बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय महालेपाडा गावाने घेतला .
भारत पाटारा ..
(महालेपाडा) खुडेद
Total Users : 10829