
शिक्षक दिनानिमित्त सक्सेस कॉम्प्युटर्सकडून मोखाडा तालुक्यातील शिक्षकांचा विशेष सन्मान. मोखाडा - सचिन वझरे शिक्षक दिनानिमित्त मोखाडा तालुक्यातील सर्व शाळांना दरवर्षीप्रमाणे भेट देऊन शिक्षकांचा सन्मान करण्याचा आगळावेगळा उपक्रम सक्सेस कॉम्प्युटर्स मोखाडाच्या संचालिका - वैशाली पाटील यांनी राबविला. मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील आश्रम शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रत्येक शिक्षकाला सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. आपल्या भावना व्यक्त करताना वैशाली पाटील म्हणाल्या की – " आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज माझ्यामध्ये जे काही चांगले आहे त्यामध्ये माझ्या आई-वडिलांसह शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षक केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे नसून आयुष्याला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. डॉक्टर चुकला तर एक रोगी दगावतो; पण शिक्षक चुकला तर एक पिढी बरबाद होते. म्हणूनच शिक्षक हे केवळ पद नाही तर ती एक साधना आहे. तेच खरे निर्माता, शिल्पकार, प्रेरणास्थान असून सन्मानास पात्र आहेत." शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी डोळ्यात अंजन घालणारा संदेश दिला की, " लोक देवाला भेटण्यासाठी देवळात जातात आणि मी मात्र अखंड ज्ञान देणाऱ्या ज्ञानमंदिरात येते कारण ; माझ्या मते खरे देव म्हणजे आपल्या परिवारापासून दूर राहून ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याचे अविरत कार्य करणाऱ्या या खऱ्या देवतांचा सन्मान करणे हीच माझी शिक्षकांप्रती कृतज्ञता." यावेळी त्यांनी शिक्षकांना डिजिटल युगाशी सुसंगत राहण्यासाठी "Digital Empowerment for Teachers" हा मोफत ऑनलाइन कोर्स तसेच शासनमान्य MS-ACIT कोर्स करण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षकांना बहुमूल्य मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, शिक्षकांनी AI च्या युगात अपडेट राहणे ही काळाची गरज आहे. आपल्या भागातील विद्यार्थी चांगला शिकला पाहिजे हीच त्यांची खरी तळमळ आहे. अत्यंत मेहनती स्वभाव, गावावर प्रचंड प्रेम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास या गुणांमुळे त्यांचे काम समाजात प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षकांनी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे. कोणीतरी आपली दखल घेत आहे आणि सन्मान करीत आहे हीच खरी आमची ऊर्जा आहे. अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या स्तुत्य उपक्रमाचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Total Users : 10828