
ज्येष्ठतेवर गदा! अन्यायाविरोधात शिक्षक अनिल शेलार २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणावर. …! पालघर प्रतिनिधी दि. 16 सप्टेंबर – ३४ वर्षे कायम सेवा करूनही ज्येष्ठतेची पायमल्ली झाल्याचा आरोप करत शिक्षक भारतीचे पालघर जिल्हाध्यक्ष अनिल बाबूराव शेलार यांनी प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी ते तहसिलदार कार्यालय, वाडा येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे.खैरे आंबिवली येथील श्रीमती सुरेखा एच. गार्डी स्वजन विद्यालयात सेवेत असलेले शेलार हे शासनाच्या २८ जानेवारी २०२५ च्या परिपत्रकानुसार सेवाज्येष्ठ असूनही, मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी त्यांना वगळून कनिष्ठ शिक्षकाचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक), पालघर यांच्याकडे सादर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.गेल्या दोन वर्षांत सेवाज्येष्ठतेची यादी न देणे, गोपनीय अहवाल न तयार करणे यामुळेच हा अन्याय झाला असल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. त्यांनी या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून वकिलामार्फत नोटीसही बजावली आहे.“संस्थेतील ज्येष्ठतेची उघड पायमल्ली होत आहे. एका संघटनेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या शिक्षकावर अन्याय केला जात आहे. विभागीय चौकशी करून न्याय मिळालाच पाहिजे,” असा ठाम इशारा शेलार यांनी दिला आहे.
Total Users : 10828