
पालघर, ता. २६ (बातमीदार) ः पालघर विभागात गेल्या चार दिवसांपासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यात अनधिकृतपणे वीजवापर करणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई केली जात आहे.
या मोहिमेत आतापर्यंत १०२१ आकडे हटवण्यात आले आहेत.
अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांमुळे वीज वितरण यंत्रणेवर येणारा ताण कमी व्हावा, यासाठी आकडेबहाद्दरांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार पालघर विभागातील बोईसर ग्रामीण, डहाणू, जव्हार, पालघर, सफाळा, तलासरी, विक्रमगड व मोखाडा या उपविभागांमध्ये अधिक तीव्रतेने ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बोईसर ग्रामीणमध्ये १२६, डहाणू २६७, जव्हार ६५, पालघर ११५, सफाळे ८७, तलासरी १८७, विक्रमगड ८५ व मोखाडा येथे ८९ असे एकूण १०२१ आकडे हटवण्यात आले आहेत. ही मोहीम अधिक तीव्रपणे राबवण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत विजेचा अनधिकृत वापर खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा कार्यकारी अभियंता मचिये यांनी दिला आहे.
Total Users : 10828