
.जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी ).
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम परीक्षेचे नियोजन शिक्षकांना त्रासदायक..!.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी गेल्या काही वर्षापासून उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदोन्नती प्राप्त झाली असता त्यांना शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचा कोर्स आयोजित केला जातो.
राज्य शासनामार्फत हा प्रशासकीय अभ्यासक्रम पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना अनिवार्य करण्यात आलेला आहे.
त्यानुसार दरवर्षी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पदोन्नती प्राप्त झालेल्या उपमुख्याध्यापक मुख्याध्यापकांना सदर कोर्सचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी शिक्षकांचा सुट्टीचा कालावधी म्हणजेच मे महिन्यामध्ये या अभ्यासक्रमाची मुख्य परीक्षा घेतली जाते.दरम्यान कोरोना कालखंडात नैसर्गिक आपत्तीमुळे या अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये मात्र कोरोना संकट दूर झाल्याने ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
मात्र सध्या शिक्षकांच्या पुढे सध्या असलेली शालेय स्तरावरील विविध प्रकारची शालेय कामे याचा कोणत्याही प्रकारे विचार न करता विद्यापीठाने परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला.
सध्या शिक्षकांना विद्यार्थी संख्या व हजेरी टिकविणे, सेतू कार्यक्रम राबविणे, विद्यार्थी प्रवेश व शालेय जबाबदारी पार पाडणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण इ कामे करावी लागत आहेत. अशा परिस्थितीत शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम परीक्षेचे चुकीचे व गैरसोयीचे परीक्षा नियोजन आल्याने शिक्षक अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
याविरुद्ध शिक्षक भारतीने तात्काळ दखल घेत व शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विद्यापीठाकडे सदर परीक्षाबाबत नियोजन पुढे ढकलावे अशा प्रकारची मागणी केली होती.
त्यानुसार काही दिवसांपूर्वीच या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक या परीक्षांचे वेळापत्रक घोषित झाले असून दि. 26 जून पासून या परीक्षा घेण्यात येत आहेत.
यातील आश्चर्याची बाब म्हणजे या परीक्षेसाठीचा कालावधी प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी चार तासांचा आहे. अशा स्थितीत एकाच दिवशी दोन पेपरचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. एकाच दिवशी आठ तास बसून दोन विषयांचे पेपर लेखन करणे हा शिक्षकांवर अन्याय आहे अशा प्रकारची संतप्त भावना शिक्षण वर्गातून व्यक्त होत आहे.
याबद्दल शिक्षक भारती संघटनेने तात्काळ गंभीरपणाने दखल घेऊन याबाबत परीक्षेचे नियोजन करताना एका दिवशी एकच पेपर घेण्यात यावा आणि त्यासाठी पुरेसा कालावधी देण्याची मागणी केली आहे.
याबाबत शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी शिक्षक भारतीचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब यांच्याकडे याविषयीची गंभीर वस्तूस्थिती मांडल्यानंतर आपण याबाबत विद्यापीठाशी त्वरित संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू या असे प्रकारचे आश्वासन आमदार कपिल पाटील यांनी सर्व शिक्षकासाठी दिले आहे.
दरम्यान याबाबत कोणता निर्णय होतो याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. अन्यथा अतिशय गैरसोयीच्या पद्धतीने हा अभ्यासक्रमाची मुख्य परीक्षा द्यावी लागेल. अशा प्रकारे परीक्षा द्यावी लागणार असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये बदल व्हावा अशी आग्रही मागणी शिक्षकांच्या वतीने शिक्षक करण्यात येत आहे.
Total Users : 10828